Home दैनंदिन बातम्या पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाला एसडीआरएफने वाचवले

पुलावरून नदीपात्रात पडलेल्या इसमाला एसडीआरएफने वाचवले

आष्टीजवळच्या वैनगंगा नदीतील थरार

गडचिरोली : आष्टी ते गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळलेल्या एका इसमाला एसडीआरएफच्या चमूने मोटारबोटने जाऊन सुरक्षितपणे बाहेर काढले. आष्टी पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचाली आणि एसडीआरएफच्या पथकाने तात्काळ दाखल होऊन केलेल्या बचावकार्यामुळे त्या इसमाला जीवदान मिळाले.

देवीदास मानपल्लीवार (45 वर्ष) असे वाचवलेल्या इसमाचे नाव आहे. ते पुलावरून जात असताना वैनगंगा नदीत पडल्याचे सांगितले जाते. दैव बलवत्तर म्हणून ते पाण्याच्या प्रवाहासोबत काही अंतर वाहात जाऊन नदीपात्राच्या मध्यभागी असलेल्या उथळ भागापर्यंत पोहोचले. नंतर त्यांनी प्रसंगावधान राखत उथळ भागावर आश्रय घेतला.

दरम्यान आष्टी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांना एसडीआरएफच्या पथकाला माहिती दिली. एसडीआरएफची चमू मोटारबोट घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नदीपात्रात अडकलेल्या देवीदास मानपल्लीवार यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना आष्टीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.