Home दैनंदिन बातम्या भूपतींची नियुक्ती तीन महिन्यांसाठीच, तीव्र विरोधानंतर कुलगुरूंचा खुलासा

भूपतींची नियुक्ती तीन महिन्यांसाठीच, तीव्र विरोधानंतर कुलगुरूंचा खुलासा

ग्रामसभांचा विरोध, तर शेकापचा पाठिंबा

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आपल्या 60 सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण करणारा तत्कालीन वरिष्ठ नक्षल नेता भूपती उर्फ मल्लोजुला वेणूगोपाल राव यांची गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून केलेली नियुक्ती वादात सापडली आहे. ग्रामसभांसह काही राजकीय पक्षांनी या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे, तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीचे स्वागत केले. दरम्यान कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी भूपती यांची नियुक्ती तीन महिन्यांसाठीच असून त्यांच्याकडे केवळ कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी महाग्रामसभेच्या वतीने नितीन पदा यांनी पत्रकार परिषद घेऊन भूपती यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध दर्शवला होता. जिल्ह्यात पेसा कायद्याचे अनेक अभ्यासक आणि ज्येष्ठ मार्गदर्शक असताना 40 वर्ष नक्षल चळवळीत राहून अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीकडे ही जबाबदारी देणे किती योग्य आहे, त्यांना पेसा कायद्याचा काय अनुभव आहे, असे प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या नियुक्तीला विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाने मात्र भूपती यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

प्रक्रियेनंतरच समन्वयक म्हणून नियुक्ती

भूपती यांच्या नियुक्तीवरून वादविवाद सुरू झाले असताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी नियुक्तीची प्रक्रिया आणि भूपती उर्फ वेणूगोपाल राव यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्यांची नियुक्ती जाहिरात, कागदपत्रांची छाननी व मुलाखत प्रक्रियेनंतर तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे केवळ कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहणार आहे.

एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासाठी तीन समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय 9 जुलै 2026 रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर 11 ऑगस्ट 2026 रोजी समन्वयक पदासाठी सरळ मुलाखतीची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.

समन्वयक पदासाठी 14 ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत समिती गठित करण्यात आली होती. या समितीत डॉ.सतीश गोगुलवार व डॉ.नरेश मडावी हे सदस्य होते. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 29 ऑगस्ट रोजी निवड व प्रतीक्षा यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत वेणूगोपाल यांची तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.

नियुक्तीच्या स्वरूपाबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले की, वेणूगोपाल यांच्याकडे फक्त कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहील. ग्रामसभा अथवा प्रशिक्षणामध्ये कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले आहे.