चामोर्शी : चामोर्शी ते मूल मार्गावरील वाघोली शिवारात एका अनोळखी तरुणाचा रक्तबंबाळ स्थितीतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 30 ते 35 वर्ष वयोगटातील या तरुणाची डोक्यात एखाद्या शस्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नारायणपूर चक क्र.2 येथील एका शेतकरी महिलेच्या हत्येचे गूढ कायम असताना अवघ्या तीन दिवसात तालुक्यात दुसरी रहस्यमय हत्या झाल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी (दि.7) रात्री 10 वाजताच्या सुमारास चामोर्शी-मूल मार्गापासून सुमारे 100 मीटर अंतरावर आत सदर युवकाच्या हत्येची घटना उघडकीस आली. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. चामोर्शी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मृत तरुणाकडे त्याची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असा कोणताही पुरावा, माहिती उपलब्ध नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
गळ्यात चांदीची चेन, हाताला घड्याळ
पोलिसांनी मृत तरुणाचे वर्णन जाहीर केले असून, ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. मृताचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट आहे. रंग गोरा आणि शरीरयष्टी सडपातळ आहे. अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट, गळ्यात चांदीची चेन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ, तर पायात पॅरागॉन कंपनीची प्लास्टिक चप्पल आढळली. या वर्णनाशी साधर्म्य असलेली व्यक्ती आपल्या परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा मृत तरुणाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने चामोर्शी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळ व त्याच्या आसपासच्या परिसरातील संभाव्य पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच चामोर्शी-मूल मार्गावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. संशयित व्यक्ती किंवा वाहनांची माहिती मिळते का, याचा शोध घेतला जात आहे.
महिलेच्या हत्येचे गूढ कायम
दरम्यान चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर चक (क्र.2) येथील गोपिकाबाई गायकवाड या वृद्ध महिलेची शेतातून परत येताना दि.5 सप्टेंबर रोजी रहस्यमय हत्या झाली होती. त्या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नसताना तीन दिवसात तालुक्यात दुसरी हत्या झाली आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
































