Home राजकीय घडामोडी शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पोळ्याचा सण सोडून विद्यार्थी येणार शाळेत

शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पोळ्याचा सण सोडून विद्यार्थी येणार शाळेत

शेतकऱ्यांशी देणेघेणेच नाही- ब्राह्मणवाडे

पत्रपरिषदेत बोलताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी

गडचिरोली : वर्षातून एकदाच येणारा, शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्वाचा असा पोळ्याच्या सण आज जिल्हाभर साजरा होत आहे. गावागावात बैलांना सजवून पोळा भरविला जात आहे. हा सण सर्वांना उत्साहाने आणि आनंदाने साजरा करता यावा यासाठी जिल्हाभरातील शाळांना सुटीही देण्यात आली आहे. मात्र नेमक्या या सणाच्या दिवशी शिक्षणमंत्री दादा भुसे गडचिरोली जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देणार असल्याने संबंधित शाळांच्या विद्यार्थ्यांना पोळ्याच्या आनंदावर विरजण सोडत शाळेची वाट धरावी लागणार आहे.

शेतकरी संघर्ष कृती समितीचे संयोजक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शिक्षणमंत्र्यांवर टिका करत मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या सणावाराशी, त्यांच्या सुख-दु:खाशी काही देणे-घेणे नाही, असा आरोप केला आहे. ब्राह्मणवाडे यांनी बुधवारी काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

त्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सणाच्या दिवशी काढलेल्या दौऱ्यावर आणि शाळा भेटीवर त्यांनी आक्षेप घेतला. शिक्षणमंत्री ज्या शाळांना भेटी देणार तिथल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पोळ्यासारखा सण सोडून शाळेत यावे लागणार आहे. वास्तविक शिक्षणमंत्र्यांनी या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आवर्जून भेटी द्याव्या, त्यांची दूरवस्था, असलेल्या सोयीसुविधांची पाहणी करावी, पण सणासुदीच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास भाग पाडून त्यांच्या आनंदावर विरजण टाकू नये, अशी अपेक्षा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली.

या पत्रपरिषदेला जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, कुसूम अलाम, सतीश विधाते, प्रमोद भगत, प्रभाकर वासेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

शिक्षणाधिकाऱ्यांची सारवासारव

पोळ्याच्या सणानिमित्त सर्व शाळांना सुटी असली तरी काही शाळांमध्ये पोळ्याचा सण साजरा केला जातो. त्यामुळे अशाच काही शाळांना शिक्षणमंत्री दादा भुसे भेट देणार आहे, अशी सारवासारव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांनी केली. मात्र सणाच्या दिवशी विद्यार्थी शाळेत येऊन पोळा साजरा करत असल्याचे आतापर्यंत कधीही ऐकिवात नव्हते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तर काही शाळांनी ही नवीन परंपरा सुरू केली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.