गडचिरोली : मुरुमगाव परिसरातील 31 वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाला, तर महिलेचा रुग्णालयात पोहोचताच मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसात गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना असल्याने आरोग्य विभागाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र मुरूमगावच्या घटनेसाठी नेमके कोण जबाबदार हे सध्यातरी स्पष्ट होऊ शकलेले नाही. सदर महिलेच्या गर्भधारणेसंदर्भात प्राथमिक नोंदीच उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य कर्मचारीही तिच्या गर्भधारणेपासून अनभिज्ञ होते, अशी चर्चा आहे.
प्राथमिक चौकशीनुसार, संबंधित महिला दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव येथे दाखल झाली होती. तपासणीदरम्यान तिची प्रकृती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तसेच प्राथमिक माहितीनुसार, आरोग्य संस्थेत दाखल होण्यापूर्वीच गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आवश्यक प्राथमिक उपचार करून महिलेला पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात आले.
उपलब्ध नोंदींच्या प्राथमिक पडताळणीत संबंधित महिलेची गर्भधारणेदरम्यान नियमित नोंदणी, प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) आणि सातत्यपूर्ण आरोग्य तपासणी अपेक्षित प्रमाणात झालेलीच नव्हती. मुळात त्या महिलेने गर्भधारणा झाल्याची बाब लपविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे गर्भधारणेच्या कालावधीत नियमित फॉलोअप, घरभेटी, संभाव्य जोखीम ओळखणे आणि संस्थात्मक प्रसूतीचे नियोजन याबाबत अपेक्षित सातत्य होते किंवा नाही, याची पडताळणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
गर्भवती मातांची वेळेवर नोंदणी, नियमित ANC तपासणी, उच्च जोखीम गर्भवतींचे प्रभावी ट्रॅकिंग, नियमित घरभेटी तसेच आवश्यकतेनुसार वेळेत उच्चस्तरीय आरोग्य संस्थेकडे संदर्भित करणे गरजेचे असते. गर्भावस्थेसंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांना माहितीच देण्यात आली नसल्याने ही बाब संबंधित महिलेच्या जीवावर बेतल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात चौकशीअंती घटनेसाठी जबाबदार कोण, हे निश्चित करून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी स्पष्ट केले.
































