गडचिरोली : क्रीडा संस्कृतीची जोपासना करण्यासह नागरिकांमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी हॅाकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दोन दिवस विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. 28 ते 29 ऑगस्ट या कालावधीत सदर स्पर्धां जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स गडचिरोली येथे होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर दि.29 रोजी सकाळी 8 वाजता क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांनी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी केले आहे.
अशा आहेत विविध स्पर्धा आणि वयोगट
वयोगट 18 ते 40 वर्षाकरिता – 100 मीटर धावणे, योगा, फुटबॉल, स्वदेशी खेळ, इनडोअर खेळांमध्ये बॅडमिंटन, कॅरम, आर्म रेसलिंग, त्याचबरोबर मनोरंजनाचे खेळ जसे लंगडी, लिंबू चमचा.
वयोगट 41 ते 60 वर्षाकरिता – 40 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 कि.मी. चालणे, खो-खो, योगा, स्वदेशी खेळ, इन्डोअर खेळ, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, आर्म रेसलिंग
वयोगट 60 वर्षावरील नागरिकांसाठी- 300 मीटर जोरात चालणे, 1 कि.मी. चालणे, स्वदेशी खेळ, इन्डोअर खेळ, बुद्धीबळ, कॅरम