आष्टी : दारूबंदी असताना अवैधपणे रात्रीच्या अंधारात कारमधून केली जात असलेली दारूची वाहतूक रोखण्यात आष्टी पोलिसांना यश आले. पोलिसांनी चंद्रपूरकडून आष्टीकडे येत असलेली ही कार पकडून त्यातील दोन लाखांची दारू आणि कार जप्त केली. ही कारवाई दि.२१ च्या रात्री ९.३० च्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून आष्टीकडे एक दारूने भरलेली कार येत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्यासह पोलिस पथकाने आल्लापल्ली रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ नाकेबंदी केली. यावेळी एका टाटा इंडिगो मांझा या कार क्रमांक एम.एच.०२, सी.डी. ७४३१ मधून देशी दारुची वाहतूक सुरू असल्याचे आढळले. अनधिकृत विक्री किमतीनुसार ही दारू दोन लाखांची होती.
दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार सुरज मंगेश भोयर (२५ वर्ष) रा.सोनुर्ली, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरूद्ध कलम ६५ (अ) म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, उपनिरीक्षक अजय राठोड, राजू येनगनटीवार, हवालदार मोरेश्वर करमे, नाईक रवी शेडमाके, राजू पचपुल्लीवार, रवींद्र मेंदाडे, मुनेश्वर रायसिडाम आदींनी केली.