गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी रविवार, 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र या चाचणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सिटू संलग्नित आदिवासी विकास शिक्षक कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
विशेष म्हणजे जे शिक्षक जो विषय शिकवत नाही त्याही विषयाशी संबंधित प्रश्नांचे उत्तर या संयुक्त चाचणीत त्या शिक्षकांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. राज्यभरातल्या 1152 आश्रमशाळांमध्ये 10 हजारांवर शिक्षक आहेत. त्यांनी रविवारच्या चाचणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासी आयुक्तालयापुढे पेच निर्माण झाला आहे. वेळोवेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये त्या-त्या विषयाची चाचणी होत असताना वेगळी चाचणी घेण्याची गरज काय? असा प्रश्न संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी उपस्थित केला आहे.