आलापल्लीतील नवीन बस स्थानकात विविध समस्या, माजी पालकमंत्र्यांनी केली पाहणी

वाहनतळासह इतर अपूर्ण कामे पूर्ण होणार

आलापल्ली : गडचिरोलीच्या दक्षिण भागातील तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे २०१९ मध्ये मंजूर झालेल्या बस स्थानकाचे काही दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आले. मात्र बस स्थानकाचे काम अर्धवट असताना लोकार्पणाची घाई केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी अम्ब्रिशराव यांनी उपस्थित प्रवाशांसोबत संवाद साधला. त्यानंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण माहिती घेतली. अपूर्ण असलेली कामे लवकर पूर्ण करून प्रवाशांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांना दिल्या. काम अपूर्ण असताना लोकार्पण करायला इतकी घाई का केली, असा जाबही त्यांनी विचारला. त्यावर अपूर्ण असलेले वाहनतळ आणि इतर कामे तातडीने पूर्ण करणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे अहेरी तथा आलापल्ली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.