गडचिरोली : स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून ‘स्वच्छता हिच सेवा’ या मोहिमेअंतर्गत ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम गडचिरोली पोलिस दलातर्फे राबविण्यात आले. त्याअंतर्गत सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पोलिस मुख्यालयासह जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि सर्व पोलिस स्टेशन, मदत केंद्राच्या वतीने साफसफाई करण्यात आली. स्वच्छता उपक्रमाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी गडचिरोलीत पोलीस दलातर्फे पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 300 पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानात प्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन पोलिस अंमलदारांसोबत मिळून पोलिस मुख्यालय परिसरात स्वच्छता केली. सदर कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. आपले शरीर निरोगी राहावे व आपल्या आजुबाजुच्या परिसरात रोगराई निर्माण होऊ न देता प्रत्येकाने आपले घर व घराच्या आजुबाजुचा परिसर दररोज स्वच्छ करावा, असे सांगितले.
कार्यक्रमास पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा साहील झरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी पेंढरी मयुर भुजबळ उपस्थित होते.
बस स्थानकाच्या परिसरातील कानाकोपरा केला स्वच्छ
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 192 बटालियनच्या वतीने बस स्थानकात सकाळी १० वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. द्वितीय कमांड अधिकारी नरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी, तसेच काही नागरिकांनीही हातभार लावत स्वच्छतेचे महत्व लक्षात घेतले. सर्वांनी मिळून बस स्थानकाच्या आतील आणि लगतच्या संपूर्ण परिसरातील कचरा, झुडूपांची साफसफाई करून तो परिसर स्वच्छ केला. प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे शिक्षकवृंद निकेशन देऊरनले, तुषार कांबळे, राजू चारनिया, अनिकेत, रोझिना बुधवानी, पुजा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वनविभागाने दिला ‘एक तास स्वछतेसाठी’
गडचिरोली वनविभागाच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यालय तसेच मुख्य वनसंरक्षक कार्यालय परिसरात स्वछता अभियान राबविण्यात आले. या अभियानात वनसंरक्षक रमेश कुमार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. तसेच उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहायक वनसंरक्षक करिश्मा कवडे, गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, वनपाल, वनरक्षक, तसेच उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी, वनमजुर, आरआरटी चमू , टायगर मॅानिटरिंग चमूचे सदस्य सहभागी झाले होते. सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले.