शेकडो आदिवासी युवकांनी गडचिरोलीत दोन तास अडविले चारही मार्ग

धनगरांना एसटी कोट्यातून आरक्षणाला विरोध

गडचिरोली : महाराष्ट्रात अनुसूचित जमातीमध्ये धनगर आणि इतर गैरआदिवासींचा समावेश करू नये, शासकीय व निमशासकीय शाळांचे खासगीकरण करू नये, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा शासन आदेश रद्द करावा, अशा मागण्यांसाठी रविवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने गडचिरोलीत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो युवक-युवतींनी इंदिरा गांधी चौकात ठाण मांडल्याने चारही मार्गावरील वाहतूक बराच वेळ थांबली होती. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळत आंदोलनकर्त्यांना एका बाजुने करत टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू केली.

एसटी बस स्थानकाजवळ जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी खऱ्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी इंदिरा गांधी चौकापर्यंत निषेध मोर्चा काढला. त्यानंतर चौकात आंदोलकर्त्यांनी सभा घेतली. यावेळी आ.डॅा.देवराव होळी यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याविरूद्ध रोष व्यक्त करण्यात आल्याने डॅा.होळी यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान काँग्रेस नेते डॅा.नामदेव किरसान, माजी आ.नामदेव उसेंडी यांच्यासह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून समर्थन दिले.

मुख्य मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने अपर पोलिस अधीक्षक अनुत तारे (अभियान), अपर पो.अधीक्षक कुमार चिंता (प्नशासन) यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. त्यामुळे चारही बाजुने खोळंबलेल्या शेकडो वाहनांना वाट मोकळी करण्यात आली.

चक्काजाम आंदोलनाला प्रागतिक पक्षांचे समर्थन

धनगरांना आदिवासी जमातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात खऱ्या आदिवासींनी केलेल्या चक्काजाम आंदोलनाला प्रागतिक पक्ष महाराष्ट्रच्या वतीने प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होऊन समर्थन देण्यात आले. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन समर्थन दिले. याप्रसंगी रोहिदास राऊत आणि रामदास जराते यांनी प्रागतिक पक्षांच्या वतीने आंदोलनाला संबोधित केले.