गडचिरोली : राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीन सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान वन्यजीवांबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांसह वन्यजीवांच्या संरक्षणाचा संदेश देणारी मॅरेथॅान स्पर्धा, बाईक रॅली, स्वच्छता अभियान आणि ग्रामीण भागात चित्रपटाच्या माध्यमातून वन्यजीवांबाबत जनजागृती असे उपक्रम राबविण्यात आले.
यादरम्यान गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळ आढळलेल्या एका भल्यामोठ्या अजगरालाही वनकर्मचाऱ्यांनी जंगलात सोडून जीवदान दिले. काही जागरूक नागरिकांनी या अजगराबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. हा अजगर ११ फूट लांब आणि साडेसतरा किलो वजनाचा होता.
सप्ताहाच्या सुरूवातीला सामाजिक वनीकरण विभागाकडून गडचिरोलीत मिनी मॅरेथॅान स्पर्धा घेण्यात आली.यात दिडशेवर युवक-युवतींनी सहभाग घेतला. मुलांसाठी ५ किलोमीटर तर मुलींसाठी ३ किलोमीटर अंतर पार करायचे होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपवनसंरक्षक पवन जोग व विभागीय वनाधिकारी सोनल भडके यांनी केले. यावेळी विभागीय वनाधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे, सहायक वनसंरक्षक करिष्मा कवडे, प्रतीक्षा काळे, गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अधिकारी, कर्मचाऱ्यांची बाईक रॅलीही लक्षवेधी ठरली. याशिवाय १ व २ आॅक्टोबरला कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या विविध उपक्रमांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ अरविंद पेंदाम आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.