गडचिरोली : महावितरणकडून कृषी पंपांना दिवसा केवळ ६ तास वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन पिकांना ओलित करावे लागत होते. पण रात्री काही भागात वाघ आणि हत्तींच्या भितीमुळे शेतकऱ्यांसमोर पीक वाचवायचे की जीव, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा समस्याग्रस्त भागातील १४ फिडरवर आता दिवसा ६ एेवजी १० तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महावितरणच्या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी यासंदर्भातील सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळेल, असे खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले.
धानाचे पीक सध्या गर्भार आहे. दाना परिपक्व होण्यासाठी पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. ओलिताची सोय असणारे शेतकरी वीज पंपाने पिकांना पाणी देण्यासाठी जातात, पण दिवसा वीज पुरवठा खंडीत राहात असल्याने धोका पत्करून त्यांना रात्रीला शेतात जावे लागत होते. खा.नेते यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विद्युत कमिटीची आढावा बैठक झाली. यावेळी कृषीपंपांच्या लोडशेडींगचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, आमदार कृष्णा गजबे, अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता आर.के.गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्या मिटिंगमधील चर्चेची दखल घेऊन महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कृषीपंपांचे दिवसाचे भारनियमन कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका पत्करून रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज पडणार नाही.
































