महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, काय आहे कारण?

संध्याकाळपर्यंत फाटकाबाहेर मांडले होते ठाण

गडचिरोली : कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी शुक्रवार, दि.२० ऑक्टोबर रोजी घारगाव आणि कळमगाव फिडरच्या शेतकऱ्यांनी भेंडाळा येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतलेले हे शेतकरी संध्याकाळपर्यंत महावितरणच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते.

चामोर्शी तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे धान गर्भार आहेत. त्यामुळे धानाला पाण्याची खूप आवश्यकता आहे. जर पिकाला पाणी वेळेवर मिळाले नाही तर पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान संध्याकाळी चामोर्शी येथून महावितरणचे अधिकारी भेंडाळा येथे आले होते.

भेंडाळा सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या घारगाव व कळमगाव फिडरचे भारनियमन त्वरित बंद करावे, भारनियमनामुळे शेतातील पीक नष्ट होत असेल तर महावितरणने ती जबाबदारी घ्यावी आणि कृषिपंपाच्या वीज बिलांमध्ये सूट द्यावी अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.