गडचिरोली : आदिवासी समाजाच्या आरक्षणासोबत काही राज्यस्तरीय आणि काही स्थानिक मागण्यांसाठी आदिवासी बचाव कृती समितीच्या नेतृत्वात शुक्रवारी गडचिरोलीत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. अनेक आदिवासी संघटनांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातून आलेले समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास २० हजार लोकांचा हा मोर्चा गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा ठरला आहे.
या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय मिना यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही स्थानिकस्तरावरील मागण्या मान्य करण्यास अनुकूलता दर्शविली. मात्र उर्वरित मागण्यांचे निवेदन शासनाकडे पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शिष्टमंडळाला सांगितले, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष घनश्याम मडावी यांनी दिली.
या शिष्टमंडळात घनश्याम मडावी यांच्यासह आ.डॅा.देवराव होळी, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, काँग्रेसचचे प्रदेश सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॅा.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे विश्वजित कोवासे, आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके, शिवसेनेचे (उबाठा) विलास कोडाप, संयोजन समितीचे सचिव भरत येरमे यांच्यासह काही महिला पदाधिकारी होत्या.
अशी होती मोर्चाची वैशिष्ट्ये
सकाळी १० वाजतापासून गडचिरोलीत जिल्हाभरातून विविध वाहनांनी दाखल होत असलेले आदिवासी बांधव शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकवटत असल्याचे दिसत होते. हातात विविध मागण्यांचे फलक आणि जय सेवा लिहिलेली पिवळी टोपी सर्वांनी डोक्यात घातली होती. कोणी पिवळे शर्ट, पिवळी साडी, किंवा पिवळा दुपट्टा घालून मोर्चात सहभागी झाले होते. रथात क्रांतीवीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके अशी श्रद्धास्थानांची वेशभुषा केलेली बालके विराजमान होती. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवळपास साडेतीन किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी या मोर्चाला जवळपास पाऊण तास लागला. विशेष म्हणजे या मोर्चाचे समोरचे टोक आयटीआय चौकात असताना दुसरे टोक इंदिरा गांधी चौकात होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जागेअभावी त्यातील जवळपास अर्ध्या लोकांना चंद्रपूर मार्गावरच बसावे लागले. संपूर्ण मोर्चादरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, एसडीपीओ साहिल झरकर, एसडीपीओ भुजबळ यांच्यासह अनेक पोलिस निरीक्षक आणि इतर कर्मचारी तैनात होते.