गडचिरोली : येथील चांदाळा मार्गावरील गोटुल भूमिवर आदिवासी देवी-देवतांची पुजा आणि धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि.२३) केले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात त्यांनी या जिल्ह्याचे आपल्यावर अनेक ऋण असून या जिल्ह्याची कोणतीही समस्या मी प्राधान्याने सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
ना.मुनगंटीवार यांचे इंदिरा गांधी चौकात भव्य स्वागत करण्यात आले. आदिवासी पारंपरिक नृत्याने रॅलीसह इंदिरा गांधी चौकात आगमन झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार व जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर गोटुल भूमीवर आदिवासी देवी-देवतांची पूजा करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा गोटूल समिती आणि आदिवासी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याला खासदार अशोक नेते, आयोजक आ.डॅा.देवराव होळी, माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, गोटुल समितीचे अध्यक्ष नंदू नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, अविनाश पाल, मारोतराव इचोडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नरेशचंद्र काठोळे, गोवर्धन चव्हाण, लता पुन्घाटे, वर्षा शेडमाके, आदिवासी महिला नारीशक्ती संघटनेच्या लक्ष्मी कन्नाके, एम.एम.आत्राम, मोहन पुराम तसेच पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खा.अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी, प्रास्ताविक नंदू नरोटे यांनी तर संचालक मोहन पुराम यांनी केले.