आष्टी पोलिसांनी दोन दिवसात पकडली तीन लाखांची अनधिकृत दारू

दोन कारवायांमध्ये दोन वाहनेही जप्त

गडचिरोली : आष्टी पोलिसांनी छत्तीसगडमधून अनधिकृतपणे दारूची आयात करणाऱ्या एका वाहनासह दुसऱ्या एका वाहनातून दारूची वाहतूक होताना पकडले. या दोन कारवायांमध्ये तीन लाखांची दारू आणि १० लाख रुपये किमतीचे दोन वाहन जप्त करण्यात आले.

छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोरट्या दारू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले. त्याअनुषंगाने दि.23 च्या रात्रीदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी नाकेबंदी करून छत्तीसगडमधील घाटकुल ते कोनसरी अशी दारूची आयात करणाऱ्या वाहनाला (क्रमांक MH-34 AM-8075) जयरामपूर जंगल परिसरात थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वाहन चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून पळ काढला. त्या वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये १,७६,६०० रूपयांची देशी दारू आढळली. तसेच ते ६ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

या कारवाईच्या एक दिवसापूर्वीच आष्टी पोलिसांनी देशी-विदेशी दारूची (किंमत 1,25,600 रुपये) वाहतूक करणारे दुसरे एक वाहन (किंमत 4 लाख रुपये) पकडले. या दोन्ही कारवायांमध्ये दोन दिवसात एकूण 3 लाख 2 हजार 200 रुपयांची दारू आणि 10 लाख रुपये किमतीची दोन वाहने असा एकूण 13,02,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे, सोमनाथ पवार, हवालदार वाकुडकर, करमे, पो.शि. गगन गोडबोले, प्रशांत चुधरी, अतुल तोडासे, संतोष नागुलवार यांनी पार पाडली.