अहेरी : दक्षिण गडचिरोलीच्या भागात विविध बांधकामांसाठी मुरूम चोरीच्या घटना नेहमीच घडत असतात. अशाच एका कारवाईत तब्बल 1047 ब्रास मुरूम काढून नेल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तब्बल 90 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी केली.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या 10 आॅक्टोबरला अपर जिल्हाधिकारी भाकरे एटापल्लीच्या दौऱ्यावर जात असताना रस्त्याच्या कडेला शोल्डर फिलिंगसाठी मुरमाचा वापर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. तहसीलदार सैंदाणे, ना.तहसीलदार सय्यद, एटापल्लीचे ना.तहसीलदार दिनकर खोत यांना कर्मचाऱ्यांसह तात्काळ पाचारण करून रोवर यंत्राच्या सहाय्याने मोजमाप करण्यात आले. त्यात 1047 ब्रास मुरूम गायब असल्याचे दिसले. यावेळी एक ट्रॅक्टर येलचिल पोलिस स्टेशनला लावण्यात आला.
हा मुरूम लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि. यांच्या कामासाठी वापरल्या गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना गायब असलेल्या मुरूमाच्या पाच पट, म्हणजे 90 लाख 4 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.