गडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ‘दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशातच एका वृद्धाचे घर आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्याने त्याचे सर्वस्व हिरावल्या गेले. त्या वृद्धाला हिंमत देत पुन्हा आपला उद्ध्वस्त संसार सावरण्यासाठी धोडराज पोलीस मदत केंद्राच्या वतीने विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
एकीकडे नक्षलवादाशी लढताना आपले कर्तव्य पार पाडणारे गडचिरोली पोलीस सामाजिक कार्याची जाण ठेवुन नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच धाऊन जातात. अशात धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कुरचेर या गावातल्या लालसू डोलू ओक्सा (६५ वर्ष) या वृद्धाचे घर अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाले. या आगीत त्यांचे दैनंदिन रेशन, जीवनावश्यक वस्तू, तसेच शेती उपयोगी साहित्यही जळाले. यामुळे ओक्सा यांच्यापुढे निवासाचा व उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या संकटातून सावरण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने ओक्सा यांच्यासाठी हे संकट मोठे होते.
ही समस्या कुरचेरच्या ग्रामस्थांनी ग्रामभेटीत पोलीस उपनिरिक्षक सुर्यवंशी यांना सांगितली. धोडराज येथील प्रभारी अधिकाऱ्यांनी ओक्सा यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदारांना माहिती देवुन मदत करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी प्रतिसाद देत लालसू ओक्सा यांना घराचे नव्याने बांधकाम करण्यासाठी मदत केली. तसेच त्यांना दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या आवश्यक वस्तुंचे व शेती उपयोगी साहित्याचे वाटप केले. हा उपक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धोडराज येथील पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक गुरव व त्यांच्या चमुने राबविला.