कर्नाटकातील प्रचारात गडचिरोलीच्या महिला पदाधिकाऱ्यांचा डंका

भाजप प्रदेश सदस्य रेखा डोळस यांची बेळगावात चर्चा

गडचिरोली : कर्नाटक राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात गडचिरोलीसह विदर्भातील महिला पदाधिकारी सहभागी झाल्या आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस यांच्या नेतृत्वात विदर्भातील अनेक महिलांनी कर्नाटकमध्ये डेरा टाकला आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील बहुचर्चित बेळगाव परिसरात रेखा डोळस व इतर महिलांनी प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होऊन आपल्या वर्क्तृत्वाची छाप पाडली.
प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. बेळगाव दक्षिण भागातील आमदार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ बेळगाव येथे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद, रेखा डोळस व स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध प्रभागात बैठका घेतल्या. तसेच विविध मतदारसंघात प्रचार केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा उहापोह केला.