गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गडचिरोली पंचायत समितीमधील मुरमाडी येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि लोककल्याणकारी निर्णयांची, योजनांची माहिती वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्या, असे आवाहन यावेळी खा.अशोक नेते यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले.
केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचे हे एक माध्यम आहे. यात ३५०० हून अधिक वनधन विकास केंद्र, २०२६ पर्यंत ७४० एकलव्य विद्यालय सुरू करण्याचे ध्येय, आदिवासी समुदायाचे सक्षमीकरणात १.१ लाख कोटीची तरतूद, वन अधिकार अधिनियम, पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत १ कोटी आदिवासी परिवारांना लाभ, अशा अनेक योजनांचा समावेश असून विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार नेते यांनी केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप खासदार अशोक नेते व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी केले.
यावेळी मंचावर सरपंच भोगेश्वर कोडाप, पशुधन विकास अधिकारी डॉ.लेखामी, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन भुसारी, सामाजिक नेते मनोहर भोयर, यशवंत डोईजड, तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक, आशा वर्कर, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.