विदर्भ राज्य निर्मितीसाठी संकल्प यात्रेला राजनगरी अहेरी येथून सुरूवात

विदर्भवादी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

अहेरी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी पुन्हा एकदा विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करत संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली. कट्टर विदर्भवादी नेते स्वर्गीय राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या अहेरी येथील पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार आणि समितीचे अध्यक्ष अॅड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वात यावेळी जय विदर्भच्या नाऱ्यासह विविध घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला.

विदर्भ राज्यासाठी कट्टर विदर्भवादी स्व.विश्वेश्वरराव महाराज, स्व.सत्यवानराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनाची साक्षीदार असणाऱ्या आणि विदर्भ आंदोलनाची जन्मभूमी असलेल्या अहेरी येथून पुन्हा नव्या जोमाने जनजागृती करत स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन पेटविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विदर्भवादी नेते तथा कार्यकर्ते उपस्थित होते. ही यात्रा गडचिरोली जिल्ह्यात फिरून नंतर इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहे.