गडचिरोली : औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी परिसरात असलेल्या सहा गावांमधील ८९८.८४२२ हे.आर. खासगी जागेचे भूसंपादन करून तो परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून राखिव राहणार आहे. त्यात कोनसरी, मुधोली चक १, मुधोली चक २, जयरामपूर, सोमनपली आणि पारडी देव या सहा गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियम १९६१ अन्वये तेथील जागेचे भूसंपादन करण्याची कारवाई करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चामोर्शी औद्योगिक क्षेत्राकरिता लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेड यांना ५०.२९ हेक्टर आर क्षेत्राचा भूखंड क्र ए-१ वाटप केला होता. त्यावर आता उद्योगाची उभारणी झाली आहे. या प्लान्टच्या विस्ताराकरिता त्या भूखंडाला लागून असलेले अतिरिक्त क्षेत्र पास थ्रू पद्धतीने संपादन करण्याची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने सहा गावांमधील खासगी जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल डॅा.देवराव होळी यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
जिल्ह्यात लॅायड्स मेटल्सच्या कोसनरी येथील लोहप्रकल्पानंतर इतरही मोठे उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो युवकांना नोकरीच्या मोठ्या संधी प्राप्त होतील, असा दावा केला जात आहे.
मुधोली चकच्या गावकऱ्यांचा विरोध
दरम्यान मुधोली चक क्र.२ येथील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध दर्शवला. प्रकल्पात आमची कसदार जमीन गेल्याने शेती करणे कठीण होईल, आमच्या पूर्वजांच्या आठवणी असलेली घरे जातील अशी शंका व्यक्त करत नागरिकांनी जमीन हस्तांतरण करण्यास विरोध दर्शविला आहे.