गडचिरोलीकर शास्रज्ञ डॉ.प्रकाश हलामी यांना डॉ.जी.बी.मांजरेकर पुरस्कार

मोहफुलाच्या दारूवरही करताहेत संशोधन

गडचिरोली : भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ संस्थेच्या ६४ व्या संमेलनामध्ये डॉ.प्रकाश हलामी यांना त्यांच्या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रातील विशेष योगदानासाठी डॉ.जी.बी. मांजरेकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॅा.हलामी हे गडचिरोली जिल्ह्याचे सुपूत्र आणि सध्या म्हैसूर येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था येथे मुख्य वैज्ञानिक तथा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

हे अधिवेशन बुंदेलखंड विद्यापीठ झाशी (उत्तर प्रदेश) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष व सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे शैक्षणिक सल्लागार असलेले डॉ.डी.पी.सिंग या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. तसेच देशातील आणि अमेरिका, जर्मनी, कोरिया येथील मिळून जवळपास ५०० प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित होते.

भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ संस्था ही देशातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहे. ही संस्था दरवर्षी एक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अधिवेशन आयोजन करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैज्ञानिकांचा गौरव करीत असते. यावर्षीचा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्याचे वैज्ञानिक म्हैसूर येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद -केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था येथे मुख्य वैज्ञानिक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ.प्रकाश हलामी यांना देण्यात आला.

डॉ.हलामी यांनी आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दोन प्रोबायोटिक तंत्रज्ञान विकसित केले. तसेच जीवाणू आणि प्रतिजैविक प्रतिकार यावर त्यांनी काम केले आहे, ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.

लोक पिपात ती मोहफुलाची दारू घातक, शुद्धीकरण गरजेचे

डॉ.हलामी यांच्याकडे त्यांच्या नेहमीच्या कामाव्यतिरीक्त, भारतीय मानक ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून मद्यपान समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. मद्यपान उद्योजक तसेच केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे वैज्ञानिक या समितीचे सदस्य आहेत. या समितीची एक बैठक नुकतीच घेण्यात आली, ज्यामधे मोहफुलांपासून बनविल्या जाणाऱ्या पेयाबाबत चर्चा करण्यात आली. सध्या मोहफुलांपासून बनलेल्या पेयाचा (दारू) खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वापर होतो. पण यामध्ये कुठल्याच वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब न केल्याने हे पेय शरीराला अपायकारक ठरताना दिसून येत आहे. त्यामुळे चुकीच्या भावना लोकामध्ये निर्माण होत असतात. दुसरीकडे विदेशातील पेय जसे की व्होडका, शॅम्पेन, स्कॅाच विस्की अशा पेयांची खूप मागणी वाढत आहे. आपण मोहफुलांवर तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक चांगल्या प्रकारचे पेय बनविले तर त्याला जास्त किंमत मिळू शकते आणि मोहफुल गोळा करणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला जास्त मोबदला मिळू शकतो. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू असून येत्या काही दिवसात एक चांगले पेय मार्केटमध्ये उपलब्ध करून देऊ, असा विश्वास डॉ.हलामी यांनी व्यक्त केला आहे.