गडचिरोली : नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू असताना छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या एका नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. महेंद्र वेलादी (३२) असे त्याचे नाव असून तो छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत केलेल्या हिंसक कारवायांसाठी त्याच्यावर राज्य शासनाने दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीतील इंद्रावती नदीजवळ दामरंचा आणि मन्नेराजाराम पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांची माहिती घेण्यासाठी फिरत असताना त्याला विशेष अभियान पथकाच्या जवानांसह सीआरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले.
वन कर्मचाऱ्यांवर हल्ला, जाळपोळ, चकमक, खून अशा अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर असल्याचे गडचिरोली पोलिसांनी सांगितले
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.