युवकांना नोकरीची, आम्हाला युवकांची चिंता, भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

आलापल्लीत सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा

भरती मेळाव्यात युवकांसोबत संवाद साधताना भाग्यश्री आत्राम

अहेरी : युवकांना रोजगार व नोकरीची चिंता, तर आम्हाला युवकांची चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व ध्येय आहे. त्यासाठी आमची धडपड सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

आलापल्ली येथील क्रीडा संकुलात सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सुरक्षा रक्षक पदाच्या मेगा भरतीच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आलापल्लीचे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, ग्राम पंचायत सदस्य पुष्पा अलोणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, नागेपलीचे उपसरपंच मलरेडी येमनुरवार, रतन दुर्गे, श्रीकांत मद्दीवाऱ, सोमेश्वर रामटेके, मनोज बोल्लुवार, कैलास कोरेत, प्रीती इष्टाम, अनुसया सपीडवार, संतोष अर्का, गीता दुर्गे, सुचिता खोब्रागडे, नगरसेवक अमोल मुक्कावार, श्रीनिवास विरगोनवार, वासुदेव पेद्दीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी भाग्यश्रीताई म्हणाल्या, युवक हेच देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. युवकांच्या हाताला काम व नोकरी मिळाली की युवकांचा स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा व गावाचा विकास होण्यासाठी चालना मिळते. तसेच कायमस्वरूपी आनंदाचे वातावरण निर्माण होते, असे म्हणत त्यांनी सुरक्षा रक्षक पदाच्या पर्मनंट मेगा भरतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

तत्पूर्वी आलापल्ली ग्राम पंचायतीच्या वतीने भाग्यश्री आत्राम यांचा आणि सुरक्षा रक्षक भरती अधिकारी गोरख जगताप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पुष्पा अलोणे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. आभार स्वप्नील श्रीरामवार यांनी मानले.

विशेष म्हणजे भाग्यश्रीताई यांच्या विशेष प्रयत्नातून 15 ते 20 डिसेंबरदरम्यान क्रीडा संकुल आलापल्ली येथे तर 21 ते 22 डिसेंबर दरम्यान क्रीडा संकुल सिरोंचा येथे सुरक्षा रक्षक पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.