स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी छत्तीसगड सीमेवरच्या बोटेकसा गावात आंदोलन

२७ पासून नागपुरात आमरण उपोषण

गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने “विदर्भ मिळवू औंदा” या घोषणेप्रमाणे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरच्या गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोरची तालुक्यातील बोटेकसा येथे तीन तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.

याशिवाय येत्या २७ डिसेंबरपासून नागपूरच्या संविधान चौकात आमरण उपोषण सुरू करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता निर्णायक लढा देण्याचे समितीने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी ११ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक नारे लावले.

स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, बोटेकसा ते कोरची हायवे रस्ता व कोरची तालुक्यातील इतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, बोटेकसा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती करावी, बिहिटेकला गटग्रामपंचायतअंतर्गत नळ योजनेच्या कामाला गती द्यावे, सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना गौण वनउपज व गौण खनिज टीपी देण्याचा अधिकार देण्यात यावा, मालकीच्या शेत जमिनीत व गावठानातील मालकी जमिनीच्या जागेवर असलेल्या झाडांची कापणी करण्याची मंजुरी वन विभागाने सरसकट द्यावी, घरकुल मंजूर लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता किमान पाच ब्रास रेती बिनारॉयल्टी आणण्याची मुभा देण्यात यावी, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेकरिता लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उत्पन्न मर्यादा २१ हजारवरून ५० हजार करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणी वाचून संबंधित विभागाला पाठविण्याचे मान्य केले.

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी २७ डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. रास्ता रोको आंदोलनाला समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमिटी सदस्य तात्यासाहेब मते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रसिंग ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे पाटील, नागपूर जिल्हा युवा टायगर फोर्सचे अध्यक्ष पराग वैरागडे, कोअर कमिटी सदस्य शालिक पाटील नाकाडे, गोंदिया जिल्हा समन्वयक अतुल सतदेवे, शहर समन्वयक वसंतराव गवळी, भोजराज ठाकरे, कोरची तालुका अध्यक्ष किशोर नरोटे, कुरखेडा तालुका अध्यक्ष रामचंद्र रोकडे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सोशल मीडिया अध्यक्ष हेमंतकुमार मरकाम, श्यामलाल गावडे, गणेश गावडे, महेश नरोटे, शंकर जेठूमल, सदाराम कुमरे, मनराखण सोरसाठी, उषा कुमरे, भारत सागर, रामाधर सिरसाठी, हरिश्चंद्र गंगबोईर, भगवान अडबय्या, गिरीश अडबय्या, मारगेसाई कल्लो, मानोराम कुमरे, सेवाराम ठेला, शोभीत सोंजवाल, शीतल कल्लो, भुरसेबाई होळी, शिलोबाई दूधकवर उपस्थित होते.