राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती

हलगेकर, वासेकर, भरडकर यांनाही संधी

गडचिरोली : राज्यात सत्तारूढ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची जिल्हा नियोजन समितीत सदस्यपदी वर्णी लागली आहे. त्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि माजी जि.प.सभापती नाना नाकाडे यांचा समावेश आहे.

सत्तारूढ भाजप-शिवसेनेला साथ दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून धर्मरावबाबा आत्राम यांच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरून ना.धर्मरावबाबा यांचे निकटवर्तीय असणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना नियोजन समितीत स्थान देण्यात आले. समितीच्या पुढील बैठकांमध्ये त्यांना निमंत्रित केले जाईल.