गडचिरोली : जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत दिडशे युवक-युवतींना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण तर ११० जणांना वाहनचालक प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना सोमवारी (दि.१८) समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
जिल्ह्रातील युवक-युवतींना रोजगार प्राप्त व्हावा व त्यातुनच त्यांना आर्थिक समृध्दी यावी या उद्देशाने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ गडचिरोली पोलिस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे पार पडला.
या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता म्हणाले, यापुढेही प्रशिक्षणार्थ्यांनी नोकरी लागेपर्यंत अभ्यास आणि व्यायामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. स्वत:सोबत स्पर्धा करुनच स्वत:ला सिद्ध करा. नोकरी लावण्याच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. मेडीएटरवर नाही तर मेरीटवर विश्वास ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी आंतरवर्ग शिक्षक स्वप्निल मडावी, नितीन मेडपल्लीवार व पुष्पक सेलोकर उपस्थित होते.
प्रशिक्षणात सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन त्यांना लर्निंग लायसन्स काढून देण्यात आले. पर्मनंट लायसन्सही काढून दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, तसेच सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, त्याचप्रमाणे नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक धनंजय पाटील व पोलिस अंमलदारांनी परिश्रम घेतले. आभार उपनिरीक्षक भारत निकाळजे यांनी मानले.