गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांच्या कुटुंबियांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांना आर्थिक मदत देऊन या धक्क्यातून सावरण्यासाठी दिलासा दिला.
यावेळी त्यांनी गावाकऱ्यांसोबत चर्चा केली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून गावातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना ग्रुपने जावे, रात्रीला बाहेर जाताना हातात काठी व स्वसंरक्षणासाठी कोयता घेऊन जावे, घरासामोर शेकोटी लावावी जेणेकरून वाघ जवळपास येणार नाही, अशा सूचना यावेळी प्रणय खुणे यांनी केल्या.
मानवाधिकार संघटनेच्या वतीने सरकारला पत्रव्यवहार करून आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बोलून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, येवलीचे सरपंच मोरेश्वर भांडेकर, गावातील लोमेंश कोहळे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रवी शेलोटे, राहुल झोडे, ज्ञानेंद्र बिस्वास व गोविंदपूर येथील नागरिक तथा मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.