गडचिरोली : जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील सोडे या गावात शासकीय आश्रमशाळेतील 137 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

सतत दोन दिवस मुलींची प्रकृती बिघडल्यानंतर हे प्रकरण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने गांभिर्याने घेत प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती गठीत केली होती. शिवाय अन्न प्रशासन विभागानेही तातडीने जाऊन खाद्यपदार्थांचे नमुने घेतले.
दरम्यान प्रकल्प कार्यालयाने गठीत समितीने प्राथमिक चौकशी अहवाल सादर करताच गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना यांनी मुख्याध्यापक श्याम मंडलवार आणि अधीक्षक लांडे यांना निलंबित केले.
विद्यार्थ्यांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत अशी सूचना खा.अशोक नेते यांनी डॅाक्टरांशी बोलून केली होती. आवश्यक त्या विद्यार्थ्यांना गडचिरोलीला हलवून कोणाच्याही जीविताला धोका होणार नाही याची सर्व ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. दरम्यान आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून उद्या त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाईल, असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना सांगितले.

































