– तर मी माझी आठ एकर जमीन लॅायड्स मेटल्स कंपनीला दान देणार

उपसरपंचाची ऑफर, काय आहे कारण?

गडचिरोली : माझ्या गावात लॅायड्स मेटल्स कंपनी चांगले हॅास्पिटल बनविणार असेल तर मी माझी आठ एकर शेतजमीन कंपनीला दान स्वरूपात देतो, अशी खुली ऑफर सोमनपल्लीचे उपसरपंच आणि रायपूरचे रहिवासी निलेश मडावी यांनी दिली आहे. यासोबत माझ्या गावातील (रायपूर) युवकांना रोजगार द्यावा अशीही ईच्छा त्यांनी व्यक्त केली. आपली ही ऑफर कंपनीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ क्लिपही तयार केली आहे.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे उभारण्यात आलेल्या लोहप्रकल्पाच्या विस्तारित युनिटसाठी लॅायड्स मेटल्सला आणखी जागेची गरज आहे. औद्योगिक विकासामुळे त्या भागाचा चेहरामोहरा बदलून रोजगाराच्या संधी वाढणार असल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचवेळी काही नागरिक आपली परंपरागत शेती करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र गावातील नागरिकांचे आरोग्य आणि युवा वर्गाच्या भविष्याचा विचार करून सोमनपल्लीचे सरपंच मडावी आपली ८ एकर जमीन कंपनीला दान स्वरूपात देण्यासाठी तयार झाल्याने परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.