गडचिरोली : नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम भामरागड तालुक्याच्या काही भागात दिसून आला. रात्री नक्षल्यांनी भामरागड – आलापल्ली मार्गावरील बेजूर फाट्यालगत झाड तोडून रस्त्यावर टाकले. त्यामुळे हा मार्ग सकाळी काही वेळासाठी बंद होता. पोलिसांनी झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
याशिवाय भामरागड-लाहेरी मार्गावर बंदचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ करत २२ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली होती.
भामरागड तालुक्यासह छत्तीसगड सीमावर्ती भागात इतरही तालुक्यात नक्षली बंदचा थोडा परिणाम दिसत होता. दरम्यान पोलिसांनी सतर्क राहून सर्वत्र गस्त वाढविल्यामुळे कोणती हिंसक घटना घडविण्यात नक्षलींना यश आले नाही.