सिरोंचा : पुरुषांसोबत महिलाही सक्षम व्हाव्यात, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. महिलांना याचा मोठा फायदा होत असून केंद्र व राज्य सरकारचा महिला सशक्तीकरण हा अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम बामणी येथे (गुरुवार) २१ डिसेंबर रोजी महिला सशक्तीकरण अभियान घेण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पटले, तालुका कृषी अधिकारी बोबडे, वैद्यकीय अधिकारी मडावी, उपअभियंता नरवडे, ठाणेदार दांडे, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, सत्यम पिडगू, समय्या कुळमेथे, मदनय्या मादेशी, रामकृष्ण नीलम, वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, जाफराबादच्या सरपंच निर्मला कुळमेथे, गर्कापेठाचे सरपंच सुरज गावडे, जाफराबादचे उपसरपंच स्वामी गोदारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम यांनी दुर्गम भागातील महिलांना तालुका मुख्यालयी जाऊन योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही, त्यामुळे शासन आपल्या दारावर आल्याने विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे. त्याचा महिलांनी पुढे येऊन पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तहसीलदार शिकतोडे यांनी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. ज्या महिलांना योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची अडचण भासत असेल त्यांनी थेट संपर्क करावा असे आवाहन केले.
अभियानात बोरमपल्ली, कंबालपेठा, सिरकोंडा, जर्जपेठा, रोमपल्ली, वेनलाया, कोटापल्ली, झेंडा, दरशेवाडा, बोगटागुडम, बाँड्रॉ, रेगुंठा, विठ्ठलरावपेठा, नरसिंहपल्ली, पर्सेवाडा, गर्कापेठा, बामणी आदी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.