गोंदिया : राज्य सरकारने यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगला फायदा होईल, असे म्हणत या निर्णयासाठी राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठरावा गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वप्रथम मांडला. त्याला सर्वांनी एकसुरात प्रतिसाद देत हा ठराव संमत केला. यावेळी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त खा.नेते यांनी शुभेच्छा दिल्या.
गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गोंदिया-भंडाराचे खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री परिणय फुके, आ.अभिजित वंजारी, आ.विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.सहसराम कोरेटी, आ.विजय रहांगडाले, गोंदियाचे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी चिन्मय गोटमारे, पो.अधीक्षक निखिल पिंगळे, सीईओ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कचारगड देवस्थान अ श्रेणीत घेण्याचा ठराव
लाखो आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड देवस्थानाला ब मधून अ श्रेणीचा दर्जा देण्याचा ठराव डीपीसी बैठकीत घेण्यात आला. याशिवाय ढासगडला क मधून ब श्रेणीत टाकण्याचा ठराव घेण्यात आला. बामणी ते धानोली रेल्वे क्रॅासिंग रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून पेंडींग आहे. परिणामी २५ किलोमीटरचा फेरा पडत आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरू करावे, अशीही सूचना यावेळी खा.नेते यांनी केले.