विहिरगाव येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमात भारावल्या परिसरातील महिला

सांस्कृतिक कार्यक्रमातही उत्फूर्त सहभाग

देसाईगंज : तालुक्यात मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियानांतर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालयाच्या वतीने केले जात आहे. २१ डिसेंबर रोजी विहिरगाव येथे सदर कार्यक्रम पार पडला. यात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विशेषत: महिलांसाठी सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने विहिरगाव परिसरातील महिला अक्षरश: भारावून गेल्या.

युवक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रिती डुडूलकर, तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी सभापती तथा युवक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रमाकांत ठेंगरे, माजी पं.स.सभापती प्रिती शंभरकर, वनक्षेत्रसहाय्यक कैलास अंबादे, विहिरगावच्या सरपंच भारती जुमनाके, पोटगावचे सरपंच विजय दडमल, नायब तहसीलदार गेडाम, नायब तहसीलदार बेहरे, उपसरपंच सारंगधर शंभरगर, वैद्यकीय अधिकारी डॅा.बन्सोड आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने नागरीकांना द्यावयाचे विविध दाखले, पंचायत समिती व ग्रा.पं.च्या वतीने तसेच महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने द्यावयाच्या विविध लाभाच्या योजना एकाच छताखाली देण्यात आल्या. यात रहिवासी प्रमाणपत्र, मालमत्ता कर आकारणी उतारा, जन्म-मृत्यु प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचा दाखला, बीपीएल दाखला, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पुर्णत्वाचा दाखला, प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीअंतर्गत महिला बचत गटांना धनादेशाचे वितरण व बचत गट नोंदणी प्रमाणपत्र, शौचालय आसल्याचा दाखला, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती, कामगार कल्याण ई-श्रम कार्ड, आरोग्य विभागामार्फत आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड आदींचे वितरण करण्यात आले.

महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव होणे गरजेचे- आ.गजबे

स्त्री शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. परंतु ग्रामीण भागातील महिलांना याची जाण नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले हे मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन यावेली आमदार कृष्णा गजबे यांनी उद्घाटपर भाषणातून केले. सोबतच सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमासाठी तलाठी नागरे, ग्रा.पं.विहिरगाव यांनी सहकार्य केले.