कोरेगाव भिमा शौर्य दिन सन्मानार्थ अहेरीत उत्साहात निघाली रॅली

विजयस्तंभ, दीक्षाभूमी प्रतिकृतीचे आकर्षण

अहेरी : येथील बोधीसत्व बहुउद्देशीय सामाजिक मंडळ व ज्ञान प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १ जानेवरी रोजी कोरेगाव भिमा शौर्य दिन उत्साहात साजरा करून मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली. यावेळी जय भीमच्या गजराने अहेरी नगरी दुमदुमून गेली.

रॅलीत भीमकन्या व भीमसैनिकांनी कोरेगाव शूरवीरांच्या सन्मानार्थ गीतगायन करून जयघोष करत निळी सलामी दिली. देशात फुले, शाहू, आंबेडरांच्या विचाराशिवाय पर्याय नसून खऱ्या अर्थाने देशाला त्यांचे विचारच तारणार असल्याचे मत ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे यांनी व्यक्त केले.

महारॅलीत कोरेगाव-भिमा विजयस्तंभ व दीक्षाभूमीची प्रतिकृती आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रथ आकर्षणाचे केंद्र होते. यावेळी बहुसंख्येने समाजबांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.