‘आव्हान’ शिबिरातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन घ्यावा- कुलगुरु डॉ.बोकारे

विद्यापीठांच्या संघव्यवस्थापकांचा सत्कार

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या चमुची सकारात्मकता आणि विश्वास यामुळेच आम्ही येणाऱ्या अडचणींवर मात करू शकलो. आम्हाला ‘आव्हान’ शिबिराचा अनुभव जरी नसला तरी हे आव्हान आम्ही पेललं. महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठात पुरेशा सुविधा नसल्या तरी इथली लोकं सक्षम आहेत. आम्ही कुठल्याही बाबतीत कमी नाही. आव्हानच्या या शिबिरातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन घ्यावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित आव्हान शिबिराच्या नवव्या दिवशी मंगळवारी राज्यभरातून आलेल्या २२ विद्यापीठातील ३७ महिला आणि ३७ पुरुष संघव्यवस्थापक आणि एन.डी.आर.एफ. चमुच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू बोलत होते.

यावेळी मंचावर प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, एनडीआरएफचे इन्स्पेक्टर पंकज चौधरी, कवियत्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.सचिन नाद्रे, गोंडवानाचे रासेयो संचालक तथा आव्हानचे समन्वयक डॉ.श्याम खंडारे उपस्थित होते.

इन्स्पेक्टर चौधरी म्हणाले, आपत्ती ही शार्क माश्यासारखी असते. जर आपण काळजी घेतली नाही तर आपले जीवन अस्ताव्यस्त करून टाकते. त्यामुळे आव्हानच्या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. प्रत्येक महाविद्यालयाने या आव्हान शिबिरानंतर कॉलेज स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग तयार करायला हवा. अशा या विभागांचा समाजातील लोकांना उपयोग होईल, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला वित्त व लेखाअधिकारी भास्कर पठारे हेसुद्धा उपस्थित होते. प्रास्ताविक रासेयो संचालक तसेच आव्हान २०२३ चे समन्वयक डॉ.श्याम खंडारे यांनी, संचालन प्रा.डॉ.हेमराज निखाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ.प्रिया गेडाम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.