सुरजागडच्या ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोलीतून बसगाड्या सोडा

शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान आयोजित ठाकूरदेव यात्रेकरीता गडचिरोली आगारातून सुरजागडसाठी विशेष यात्रा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

गडचिरोलीच्या आगार प्रमुखांना पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी पत्र दिले. जिल्ह्यातील माडिया आदिवासी जमातीचे दैवत असलेल्या ठाकूरदेवाची यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेला गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. यात्रेदरम्यान ढोल-मांजऱ्यासह पारंपरिक रेला नृत्य आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन होत असते.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयावरूनही मोठ्या संख्येने भाविक ठाकुरदेव यात्रेला हजेरी लावतात. मात्र गडचिरोली ते सुरजागड अशी प्रवासाची सक्षम व्यवस्था नसल्याने भाविकांची गैरसोय होते, ती दूर करावी अशी मागणी जराते यांनी केली आहे.