गडचिरोली : माझ्यासह आपल्या सर्वांसाठी गडचिरोली जिल्हा ही पुण्यभूमी आहे. येथे आपल्यासोबत मीसुद्धा गडचिरोलीकर म्हणूनच काम करत आहे. आता या पुण्यभूमीत सर्वांगीण विकासाची पहाट उगवत आहे. गडचिरोली प्रेस क्लबने दिलेल्या या पुरस्काराचे माझ्या मनात विशेष स्थान आहे. मात्र या भागातील गोरगरीब नागरिकांचे उत्थान हाच माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असेल, असे भावोद्गार लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांनी काढले.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या ‘दर्पण’या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा वर्धापन दिन (६ जानेवारी) मराठी पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने दिला जाणारा ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी (दि.६ ) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला. या पुरस्काराने लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे हेमंत जंबेवार आदी उपस्थित होते.
यावेळी बी.प्रभाकरन म्हणाले, गडचिरोली प्रेस क्लबने दिलेला हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नाही, मी हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्याची संधी मिळाली आहे. इथे उद्योगाची उभारणी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण जिल्हावासींचे प्रेम, सदिच्छा व आशीर्वादामुळे खाणीसोबतच पोलाद प्रकल्प आकारास येत आहे. यासोबत इतरही उद्योग यावेत. एवढेच नाही तर स्थानिक नागरिकांनी केवळ नोकरदार न होता छोट्या उद्योगांची उभारणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गडचिरोलीचे पोलाद जाईल विदेशात
खाण क्षेत्रातही पर्यावरणपूरक नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान आपल्या जिल्ह्यातील होतकरू मुलांना शिकवायचे आहे. जिल्ह्यातील काही मुलांना आॅस्ट्रेलिया आणि इतर देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये शिकण्यासाठी आम्ही पाठवत आहोत. या जिल्ह्यातील लोह उच्च दर्जाचे असल्याने त्याची विदेशात निर्यात केली जाईल. लॅायड्स मेटल्समधून मिळणाऱ्या सरकारला मिळणाऱ्या महसुलाचा केवळ जिल्ह्याच्या बजेटमध्ये नाही, तर राज्याच्या बजेटमध्ये महत्वपूर्ण वाटा राहील, असा आशावादही बी.प्रभाकरन यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीत मायनिंग कॅार्पोरेशन बनावे- ना.धर्मरावबाबा आत्राम
अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, जिल्ह्यातील खनिज संपत्ती पाहता कोनसरीप्रमाणे आणखी दोन कारखाने उभारले जाऊ शकतात. हा जिल्हा औद्योगिक नकाशावर यावा, त्यातून रोजगाराचे माध्यम निर्माण व्हावे यासाठी मी खनिकर्म खात्याचा राज्यमंत्री असताना जिल्ह्यात खाणींच्या चार ब्लॅाकची लिज दिली होती. पण प्रत्यक्षात लोहखनिज काढण्याची हिंमत प्रभाकरन यांनी दाखविली. त्यामुळे त्यांना सर्वांची साथ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत या जिल्ह्यात मायनिंग कॅार्पोरेशन बनवावे, असा प्रस्ताव आपण शासनाला दिला असल्याचे ना.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
प्रभाकरन यांच्या हिमतीला तोड नाही- खा.अशोक नेते
यावेळी खासदार अशोक नेते म्हणाले, गडचिरोली प्रेस क्लबने प्रभाकरन यांना दिलेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा गौरव आहे. या जिल्ह्यातील खनिज संपत्तीची जाणीव अनेक उद्योगपतींना आहे, पण विपरित परिस्थितीत हे काम यशस्वी करून दाखविण्याची हिंमत बी.प्रभाकरन यांनी दाखविली. त्यामुळे त्यांच्या हिमतीला तोड नाही. हा जिल्हा आता दळणवळण सुविधांच्या बाबतीत अग्रेसर झाला असून इतरही उद्योगांना खुणावत असल्याचे ते म्हणाले.
हा प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वादच- अरविंद सावकार
सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले, येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होऊ घातलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पणाचा संदर्भ देत म्हणाले, रामायण काळात महाकांतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीशा भागातील दंडकारण्यात वसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर कुणालाच उद्योग उभारणे शक्य झाले नाही. पण तिकडे राममंदिराची उभारणी होत असताना इकडे जिल्ह्यात पोलाद उद्योगाची उभारणी होणे म्हणजे लॉयड्स मेटल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर बालसुभ्रमण्यम प्रभाकरन यांना प्रभू श्रीरामचंद्राने दिलेला आशीर्वादच आहे, असे गौरवोद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अनिल धामोडे यांनी तर संचालन मिलिंद उमरे आणि आभार सचिव नीलेश पटले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सहसचिव रूपराज वाकोडे, सदस्य सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश नगराळे, शेमदेव चाफले, विलास दशमुखे, मनोज ताजने आदींनी सहकार्य केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.