वाघ पोहोचले अहेरी, मुलचेरा तालुक्यात, एक महिला झाली वाघाची शिकार

आठवडाभरातील दुसरा व्याघ्रबळी

गडचिरोलीत : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात गडचिरोलीजवळच्या वाकडी येथे वाघाने एका महिलेला ठार केल्यानंतर रविवारी अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गावातील एक शेतकरी महिला वाघाची शिकार झाली.

सुषमा देवदास मंडल (५० वर्ष) ही महिला सकाळी शेतात कापूस वेचणीसाठी गेली असताना दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. सदर महिलेच्या घरी किराणा दुकान असून थोडी शेतीसुद्धा आहे. घटनास्थळाजवळ महिलेचा मोबाईल आणि चप्पल पडलेली होती. वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

आातपर्यंत आरमोरी ते गडचिरोली तालुक्यापर्यंतच्या क्षेत्रात मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करणाऱ्या वाघांनी आता आपला मोर्चा दक्षिण भागाकडेही वळविल्याचे दिसून येत आहे. अहेरीसोबत मुलचेरा तालुक्यातही वाघांचे अस्तित्व दिसून येत आहे.