युवकांनो, हसत खेळत जीवन जगण्यासाठी व्यसनमुक्त राहा

हरांबा येथील व्यसनमुक्ती सभागृहाच्या भूमिपूजनप्रसंगी खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

सावली : आजच्या काळात अनेक युवक व्यसनांकडे वळलेले आहेत. व्यसनांमुळे अनेकांना आपला अनमोल जीवसुद्धा गमवावा लागला आहे. व्यसन करणाऱ्या व्यक्तीचा समाजामध्ये मान-सन्मान नसतो. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक महिला विधवासुद्धा झालेल्या आहेत. दारूच्या व्यसनाने मनावर ताबा नसतो. त्यातून वाईट कृत्य घडण्याची शक्यता असतो. त्यामुळे युवकांनी हसत खेळत जीवन जगण्यासाठी व्यसनमुक्त राहून आनंदायी जीवन जगावे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या हरांबा येथे खासदार अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत व्यसनमुक्ती सभागृह बांधकामाचे भूमिपूजन खा.नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. खा.नेते व दारू व्यसनमुक्तीकर्ते संतोष महाराज यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रसंत शेषराव महाराज दारू व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने अनेक दिवसांपासून व्यसनमुक्ती सभागृहाविषयी सातत्याने मागणी केली जात होती.हरांबा हे गांव परिसरातील मोठे गांव असून पाच-सहा गावांच्या संपर्कात असल्याने या परिसरात जनजागृतीसाठी दारू व्यसनमुक्ती सभागृह होणे गरजेचे होते. त्यामुळे हरांबावासियांसोबत माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे, अशी भावना यावेळी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी व्यसनमुक्ती संघटना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल डोंगरे, व्याहाड बुज.ग्रामपंचायतचे सदस्य तथा खासदार नेते यांचे सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.यावेळी भाजप एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, प्रदेश कार्यकारीणी सदस्य स्वप्निल वरघंटे, देवराव मुद्दमवार, व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, ओमदेव मंगर,सरपंच अश्विनी बोदलकर, जिल्हा संघटक व्य.मु.दिगांबर वासेकर,पंडित काळे, रमाकांत डोईजड,पोलिस पाटील कृष्णा भुरसे, कान्होजी लोंहबरे, भाऊराव ठाकरे, संजय मेश्राम, दुधराम चरडूके, भाऊजी चापले, दिवाकर भोयर, संजय कात्रोजवार, देवराव गुरुनुले तसेच अनेक गावातील व्यसनमुक्ती समिती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कढोलीचे सामाजिक कार्यकर्ते संजय मेश्राम यांनी केले.