चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर चंद्रपूर येथील वन अकादमीच्या ‘जिज्ञासा’ सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना विद्यापीठ कायदा आणि नवे शैक्षणिक धोरण यासंदर्भात माहिती मिळण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. अशा पद्धतीचे प्रशिक्षण घेणारे गोंडवाना हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
अमरावती येथील रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, माजी प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार आणि नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डॉ.अनिल ठगे यांनी विविध सत्रांतून सिनेट सदस्यांना प्रशिक्षित केले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन व्यासपीठावर उपस्थित होते.
पहिल्या सत्रात डॉ.विनायक देशपांडे यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात कुलगुरूंचे अधिकार आणि कर्तव्य या विषयावर विस्तृत विवेचन केले. येत्या काळात बरेच मोठे बदल घडत आहेत. नवे शैक्षणिक धोरण दिशादर्शक ठरणार आहे. सोबतच तंत्रज्ञानही झपाट्याने वाढत आहे. येत्या १० वर्षांत ६५ टक्के नोकऱ्या बाद होतील असे सांगून त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांती आहे, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी मानले.