‘मिशन २०२४’साठी भाजपकडून पक्षबांधणीला वेग

जिल्हा कार्यकारिणाीच्या बैठकीतून केले चार्ज, महिनाभर चालणार महाजनसंपर्क अभियान

गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षबांधणीच्या कामाला जोरदार सुरूवात केली आहे. चामोर्शीत रविवारी (दि.२१) झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्यात आले. ३० मे ते ३० जून या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यात महाजनसंपर्क अभियान राबविणार असून त्याचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने पक्ष संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागी राहून पक्ष बळकटीकरणाचे काम करावे, असे आवाहन केले.

चामोर्शीतील बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांनी दीप प्रज्वलन करून आणि भारत माता, पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले. यावेळी मंचावर आमदार डॉ.देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बब्बू हुसैनी, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, प्रदेश सदस्य रेखा डोळस, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य सदानंद कुथे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, किसान आघाडीचे तथा नवनिर्वाचित कृ.उ.बा.समिती चामोर्शीचे संचालक रमेश बारसागडे, माजी सभापती रंजिता कोडाप, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख व पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार नेते यांनी बुथ सशक्तिकरण अभियान, संघटनात्मक कार्य, जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या बूथ रचनेबाबत आढावा घेऊन उर्वरित बुथ रचना लवकरात लवकर पुर्ण करण्याची सूचना केली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरिता सरल ॲप, मोदी ॲप यासह आवश्यक असणारे सोशल मीडियावरील ॲप डाऊनलोड करून त्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याने या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडून आलेल्या संचालकांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीला जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी, भाजपाचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह जिल्हातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.