गडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड राज्य सीमेवर असलेल्या सिरोंचा येथे अतिप्राचीन बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दक्षिणात्य परंपरेनुसार शेकडो भाविकांच्या साक्षीने, तेलंगणाच्या वेद पंडितांच्या मंत्रोपचाराने, वाजंत्र्यांच्या गजरात श्री माता गोदादेवी आणि श्री रंगनाथ स्वामींचा कल्याण महोत्सव साजरा झाला.
या मंदिरात रोज सकाळी पूजन, आरती, भजन-कीर्तन केले जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. या कल्याण महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान बालाजीसह श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामीचे दर्शन घेत असतात.
सिरोच्या येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कल्याण महोत्सवाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली आणि श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी यांचे विधिवत पूजन केले. या कल्याण महोत्सवासाठी त्यांच्याकडून 71 हजार रुपये देणगीही देण्यात आली. यावेळी महोत्सवात सहभागी भक्तगणांना महाप्रसादचे वितरण करण्यात आले.
यावेळी श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाचे पदाधिकारी, वेद पंडित, पुजारी, बालाजी भक्तगण आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सिरोंच्या येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.