दोन महिलांचा बळी घेणाऱ्या वाघाने वनविभागाच्या चमुला दिली हुलकावणी

गाईला मारले, पण सापळ्यापासून दूर

गडचिरोली : आलापल्ली वनविभागात वाघाच्या हल्ल्यात अलिकडे दोन महिलांना बळी पडावे लागले. त्यामुळे त्या वाघाला पकडण्यासाठी मुलचेरा तालुक्यात रॅपिड रिस्पॅान्स टीम दाखल झाली आहे. पण या टिमला हुलकावणी देऊन वाघाने एका गाईची शिकार केल्याची घटना बुधवारी मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही परिसरात घडली.

गेल्या ७ जानेवारीला अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा मंडल या महिलेची तर १५ जानेवारीला मुलचेरा तालुक्यातील कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या महिलेची वाघाने शिकार केली. या दोन्ही घटना आलापल्ली वनविभागाच्या हद्दीत घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली.

पुढील संभाव्य घटना टाळण्यासाठी वनविभागाने रॅपिड रिस्पॅान्स टीमला बोलवून वाघाला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी कोडसापूरच्या जंगलात ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून वाघाला पिंजऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न होता. परंतू यादरम्यान मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही गावालगत एका गाईचा फडसा पाडून वाघाने वनविभागाच्या चमुलाही चकमा दिल्याचे बोलले जाते.