गडचिरोली : येथील इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या सौजन्याने चांदाळा मार्गावरील गोटुल भूमिवर रबरी बॅाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नमो चषक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भरावयाचे क्रिकेट चमुचे नोंदणी फॅार्म खा.नेते यांनी स्वत:च्या हाताने भरले.
सर्वप्रथम मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत खा.नेते यांनी हाती झाडू घेऊन गोटूल भूमी या मंदिर गाभाऱ्यातील परिसरातील केरकचऱ्याची साफसफाई करून तो स्वच्छ केला. यानंतर या भव्य रबरी बाल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन फित कापून केले. यावेळी दोन्ही संघांचा टॉस झाल्यावर आणि संघांसोबत हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्यानंतर खासदारांनी हातात बॅट घेऊन चेंडू टोलवण्याचा आनंद घेतला.
याप्रसंगी खेळाडूंविषयी आपल्या भावना व्यक्त करताना खा.नेते म्हणाले, यावर्षी अनेक युवक वर्ग उत्साहाने नमो चषक-2024 या स्पर्धेत सहभागी होऊन खेळण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. यावेळी क्रिकेट संघाची माहिती खासदारांनी स्वतः फॅार्ममध्ये भरून त्यांची नोंदणी केली.
नमो चषक 2024 साठी नोंदणी फॅार्म सदस्यता अभियान सुरू करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्या प्रत्येक कामात साथ देऊन सदैव युवा मोर्चाच्या पाठीशी आहे, असे सांगून नमो चषक 2024 साठी जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खा.नेते यांनी केले. सर्व खेळाडूंनी नोंदणी फार्म भरून नमो चषक, नमो अॅप डाऊनलोड करून घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी खेळाडूंना दिल्या.
यावेळी आ.डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, युवा मोर्चाचे सचिव हर्षल गेडाम, युवा मोर्चाचे महामंत्री मंगेश रणदिवे, सुजित मेश्राम, संदीप वासेकर, जगदिश गडपायले, राहुल चुनचुनवार, शाहरुख पठाण, छोटु पठाण, अनिल नैताम तसेच मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.