शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे शिक्षकानेच केले लैंगिक शोषण

पत्नीने मोबाईल तपासताच भंडाफोड

गडचिरोली : स्वत:च्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून एका शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आला. मुलचेरा पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विश्वजित मिस्री (३८) असे त्या बलात्कारी शिक्षकाचे नाव आहे.

पोलिस सुत्रानुसार, सदर आरोपी शिक्षक हा त्या पीडित मुलीचा वर्गशिक्षक होता. त्याने त्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेक वेळा संबंध ठेवले.या प्रकाराचा शिक्षकाच्या पत्नीला संशय आल्याने तिने त्याचा मोबाईल तपासला असता शिक्षक-विद्यार्थिनीमधील संवाद तिला आढळला. त्यामुळे तिच्या संशयावर शिक्कामोर्तब झाले.

या प्रकाराने संतापलेल्या शिक्षकाच्या पत्नीने या प्रकाराबद्दल मुख्याध्यापकाला सांगितले. मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.