विभागीय शिबिरासाठी गडचिरोलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मांदीयाळी

कोणा-कोणाची हजेरी, काय म्हणाले?

गडचिरोली : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काय-काय तयारी केली याचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीत शनिवार, दि.२० रोजी विभागीय बैठकीचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर बुथस्तरावरील यंत्रणा सक्षम करा, असा सल्ला यावेळी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून दिला.

विशेष म्हणजे या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्रीद्वय अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, सुनील केदार, अनिस अहमद, मारोतराव कोवासे असे अनेक ज्येष्ठ नेते एकाच मंचावर आले होते.

भरगच्च भरलेल्या सभागृहात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांना यावेळी एकत्रितपणे मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी चेन्नीथला यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करणाऱ्या मोदींना जनता सहन करणार नाही आणि मोदीमुक्त भारत केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.