गडचिरोली : मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इम्पेरिअल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे निकष निश्चित करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण येत्या २४ ते ३१ जानेवारीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात येणार आहे.
एका प्रश्नावलीच्या अनुषंगाने सर्वेक्षणाच्या कामासाठी संबंधित तालुक्यांचे तहसीलदारांना नोडल अधिकारी तर नायब तहसीलदारांना सहायक नोडल अधिकारी आणि एका शासकीय कर्मचाऱ्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रविवार, दि.२१ रोजी जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले अधिकारी, कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना दि.२२ ते २३ असे दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे. दि.२४ पासून सर्वेक्षण सुरू होईल. हे सर्वेक्षण मुदतीत पूर्ण करायचे असल्याने आपल्या घरी आलेल्या प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन प्रगणकाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.